Pune Drug Case: नशेचा विळखा; अमली पदार्थांचे जाळे पुण्यातील FC रोडपर्यंत; शहरात खळबळ

प्रतिनिधी, पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत रविवारी समाजमाध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर शहर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संबंधित बारवर छापा टाकून पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ‘हा प्रकार अत्यंत गंभीर असून, स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करावे,’ असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना दिले.

गुन्हे शाखेच्या पथकांचा पबवर छापा

फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल-३’ (लिक्विड लिझर लाऊंज) बारमध्ये पहाटे पाचपर्यंत पार्टी सुरू होती. त्या वेळी प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत आहेत, असा दावा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथक, सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी पबवर छापा टाकला. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ‘डीव्हीआर’ आणि पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत संबंधितांकडे चौकशी सुरू होती.
लोकसभेला फटका, विधानसभेसाठी महायुती सावध; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

दरम्यान, या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘शिवाजीनगर परिसरातील एक बार पहाटे पाचपर्यंत सुरू राहतो. त्यात अमली पदार्थाचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक महाविद्यालये आणि शाळा आहेत. अशा परिसरात अमली पदार्थाचे सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी झोपा काढतात का,’ असा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांना कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.