Pune Crime: पुण्यात ज्येष्ठाची निर्घृणपणे हत्या, शेजारच्यानेच दिलेली सुपारी, कारण ऐकून हादराल…

प्रतिनिधी, पुणे : करणी-भानामती करीत असल्याच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यावर चाकूने वार करून फरार झालेल्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. या ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?

सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघे रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि सागर शशिकांत सोनार (वय ३२, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कारले हा पीएमपीमध्ये वाहक, तर सोनार हा चालक आहे. या प्रकरणात तक्रारदार सोनू होडे (वय ६७, रा. मोरे वस्ती, पद्मावती) यांच्यावर १५ जून रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास पद्मावती परिसरातील मच्छी मार्केट येथे चाकूने वार करण्यात आले होते. त्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन पदपथावर पडले होते. याबाबत, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तक्रारदारांनी कोणावरही संशय व्यक्त केला नसल्याने आरोपींची माहिती मिळत नव्हती.
‘तो’ अपघात नव्हे, पत्नी-मेहुणीकडून हत्या; जातेगावजवळील मृतदेहाचे कोडे उलगडले, काय घडलं असं?
दरम्यान, होडे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कुंभारला ताब्यात घेतले. त्याने तौरस कारलेच्या सांगण्यावरून हल्ला केल्याची कबुली दिली. त्यासाठी कारले याने पन्नास हजार रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी कारलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, होडे याचा खून करण्यासाठी सोनारने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. सोनार हा होडे यांचा शेजारी आहे. होडे जादूटोणा, भानामती, करणीसारखे प्रकार करून घर बळविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांचा खून करण्यासाठी सोनारने सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.