घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पतीने घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल
काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि कृष्णा मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते शनिवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजमध्ये गेले. दोघांनी तेथे मद्यपान केले. नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. कृष्णाने काजलच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून तो फरार झाला.
काही वेळाने त्याने मित्राला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन खोलीचे कुलूप तोडले असता काजल मृत अवस्थेत आढळून आली.
चोरट्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
ओैंध भागातील परिहार चौकातून सकाळी फिरण्यासाठी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडल्याने चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समीर राय चौधरी (वय ७७) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
चौधरी गुरुवारी (१३ जून) सकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले होते. ओैंधमधील परिहार चौकात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांनी चौधरी यांच्या डोक्यात गज मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून जात असलेल्या दोघांवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली होती.
ओैंधमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (१४ जून) सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, ओैंध) याला अटक करण्यात आली. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांपैकी एका मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींना दारूचे व्यसन आहे. नशेसाठी त्यांनी लूटमार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.