‘अवजड वाहनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष’
कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. त्यामुळे उपनगरातील प्राणांतिक अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून नगर रस्त्यावर सातत्याने प्राणांतिक अपघातांची संख्या वाढत आहे. ‘प्रादेशिक परिवहन विभाग’ (आरटीओ) आणि पुणे पोलिसांकडून भरधाव वेगाने वाहने दामटणारे, मद्यपी वाहनचालक आणि अल्पवयीन चालकांवर योग्य ती कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ‘वाहतूक पोलिसांकडून नियम धाब्यावर बसविणाऱ्या अवजड वाहनांकडे दुर्लक्ष केले जाते,’ असा आरोप नागरिक करीत आहेत.
प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढते
शहरात चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत १२० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून, मृत्युमुखींपैकी ४५ जण एकट्या ‘परिमंडळ चार’मधील आहेत. पूर्व उपनगरात (परिमंडळ ४) गेल्या सव्वा वर्षात रस्ते अपघातात १५१ जणांना जीव गमवावा लागला आहे. पुणे-नगर रस्त्यावर सर्वाधिक प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक ठरला आहे. वाघोली आणि परिसरात अनेक दगडाच्या खाणी, खडी मशिन असल्याने ट्रक, डंपरसारख्या अवजड वाहनांची सारखी ये-जा सुरू असते. नगर रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रमाणही मोठे आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे वाघोलीत दुचाकींचे आणि चारचाकींचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील प्राणांतिक अपघात
वर्ष अपघातांची संख्या मृतांची संख्या
२०२२ ३१५ ३२५
२०२३ ३३४ ३५१
२०२४ ११७ १२० (जानेवारी ते एप्रिल)
अपघातांची कारणे काय?
– भरधाव वेगाने वाहन चालविणे.
– मोबाइलवर बोलत वाहन चालविणे .
– विरुद्ध दिशेने गाडी चालविणे.
– धोकादायक ओव्हरटेक करणे.
– आरटीओ, वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांकडे दुर्लक्ष.