मोबाइल हरवतातच कसे?
‘नागरिकांच्या वस्तू हरवल्यास किंवा त्यांना एखादी वस्तू सापडल्यास ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर ‘लॉस्ट अँड फाउंड’ नामक प्रणाली कार्यरत आहे. त्यावर नागरिक हरवलेल्या वस्तूंची नोंद करतात. यंदा जानेवारीपासून १० मेपर्यंत ६० हजार ५१२ वस्तू हरवल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये मोबाइलची संख्या १७ हजार आहे,’ अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली. मात्र, एवढ्या मोठे संख्येने मोबाइल हरवतात तरी कसे असा प्रश्नही या आकडेवारीवरून उपस्थित होत आहे.
मोबाइल चोरीला गेल्यास…
मोबाइल चोरीला गेल्यास पोलिसांनी नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करणे अपेक्षित असते. यामध्ये हवालदाराकडेही तपास सोपविता येतो.
पोलिस नेमके करतात काय?
– बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाइल लंपास करण्याचा प्रकार असो की पादचाऱ्यांच्या हातातून जबरदस्तीने मोबाइल हिसकावून नेण्याचा प्रकार असो…पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही.
– ठाणे अंमलदार त्यांना सायबर कॅफेत जाऊन किंवा मोबाइलवरून पुणे पोलिसांच्या वेबसाइटवरील ‘लॉस्ट अँड फाउंड’वर ‘मोबाइल हरवला आहे’ अशी नोंद करायला सांगतात.
– त्यामुळे चोरट्यांनी हातातून चोरलेल्या मोबाइलचा गुन्हा दाखल होण्याऐवजी हरवल्याची नोंद होते. परिणामी, पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’वरील आकडा दिवसेंदिवस फुगतच आहे.
नोंद केली; पुढे काय?
– ‘लॉस्ट अँड फाउंड’वर तक्रार नोंद करून त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगितली जाते.
– त्यानंतर मोबाइलच्या ‘आयएमईआय’ क्रमांकावरून त्याचे ‘ट्रेसिंग’ केले जाते, असे पोलिसांकडून सांगितले जाते.
– मात्र, या प्रक्रियेतून मोबाइल मिळाल्याचा अनुभव क्वचितच एखाद्याला येतो.
प्रातिनिधिक घटना
– स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत माजी रणजीपटूचा मोबाइल हातातून हिसकावून नेला. त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही.
– कात्रजच्या बस थांब्यावर नोकरदार तरुणीच्या हातातून मोबाइल हिसकावला. पोलिसांनी ‘लॉस्ट अँड फाउंड’वर नोंद करण्यास सांगितले.
– रविवार पेठेत बोहरी आळीत ज्येष्ठ नागरिकाच्या शर्टच्या खिशातून मोबाइल पळविला. पोलिसांनी ‘लॉस्ट अँड फाउंड’वर नोंद करण्यास सांगितले.
चालू वर्षातील हरवलेल्या वस्तू (१ जानेवारी ते १० मे)
६०,५१२
एकूण हरवलेल्या वस्तू
१७,०००
एकूण वस्तूंपैकी गहाळ मोबाइल
१,०८८
सापडेल्या वस्तू