काय आहे प्रकरण?
फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३, रा. रामटेकडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. सिद्धेश्वर दिलीप चव्हाण आणि भैय्या ऊर्फ प्रसाद विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरहानचा भाऊ फरीद अब्दुल रज्जाक शेख (वय ३०) याने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा भाऊ फरहान आणि सिद्धेश्वर चव्हाण व भय्या कांबळे मित्र आहेत. वर्षभरापूर्वी सिद्धेश्वरविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो कारागृहात होता. फरहानमुळे गुन्हा दाखल झाल्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता. दोन महिन्यांपूर्वी तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्या वेळी त्याने फरहानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. फरहानने या घटनेची माहिती भाऊ फरीदला दिली होती. शनिवारी चव्हाण आणि कांबळे या दोघांनी संगनमताने शनिवारी (२० जुलै) मध्यरात्री १२ ते १२.३० या दरम्यान फरहानला रामटेकडी येथील रेल्व ट्रॅकच्या कडेला दारू पिण्याच्या बहाण्याने नेले. तेथे नेऊन आरोपींनी फरहानच्या डोक्यात रॉड मारून त्याला रेल्वे रुळांवर फेकून दिले. गंभीर जखमी झालेल्या फरहानचा त्यात मृत्यू झाला. रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. त्यानंतर आरोपी वानवडी पोलिस ठाण्यात हजर झाले. वानवडी पोलिसांनी हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
आरोपींकडून सुरुवातीला घूमजाव
रामटेकडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ आरोपी आणि फरहान यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर फरहानला धक्का दिल्याने तो रेल्वेगाडीखाली सापडला, अशी बतावणी आरोपी सिद्धेश्वरने पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत फरहानमुळे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता. त्याचा काटा काढण्याासाठीच बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघड झाला.