Pune Crime : पोलिस असल्याची बतावणी; दागिने ठेवण्याचा बहाणा, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांना लुटले

प्रतिनिधी, पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेसह एका व्यक्तीला लुटल्याचा प्रकार शनिवार पेठ आणि उंड्री येथे घडला. शनिवार पेठेतील गाडगीळ जलतरण तलावाजवळ चोरट्याने तो पोलिस असल्याची बतावणी करून, दागिने सुरक्षित ठेवण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसूत्र आणि अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन चोरट्याने पळ काढला आणि उंड्री येथे पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून नेण्यात आला.शनिवार पेठेत यशोवर्धन बिल्डिंग येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी सव्वासात वाजता घडली.

Jal Jeevan Mission : नाशिककर तहानलेलेच? जलजीवन मिशनअंतर्गत नळजोडणी अपूर्ण, लाभार्थी प्रतीक्षेत

सक्तीने काढले दागिने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शनिवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या घरापासून काही अंतर चालत गेल्या असतानाच दुचाकीवरून एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. ‘मावशी मी पोलिस आहे. तुमच्या इथे चोरी झाली आहे. मंगळसूत्र आणि हातातील अंगठी काढून पिशवीत ठेवा,’ असे चोरटा महिलेला म्हणाला. तो जबरदस्तीने त्यांचे दागिने काढू लागला. तेव्हा तक्रारदार महिलेने त्यास विरोध केला. मात्र, त्यानंतरही चोरट्याने जबरदस्तीने दागिने हिसकावून पळ काढला.

हिसकावला मोबाइल

दुसरी घटना उंड्री येथील दोराबजी मॉल येथे शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. या प्रकरणात ३६ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार व्यक्ती महंमदवाडी येथे राहायला आहे. तक्रारदार गाणी ऐकत मॉर्निंग वॉक करीत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावला. कोंढवा पोलिस याचा तपास करीत आहेत.