एकाच दिवसात किवळे, चिखली आणि खेड परिसरांत कारवाई करून चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. किवळे येथे घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून तो लहान सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री केल्याप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली.
यात पोलिसांनी ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जय भवानी गॅस सर्व्हिस येथे कारवाई करून विष्णुकांत मोरे (वय २७, रा. किवळेगाव, मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अजित कुटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोरेने त्याच्याकडे कसलाही परवाना नसताना घरगुती वापराच्या सिलिंडरमधून ‘रिफील’च्या साह्याने कोणतीही खबरदारी न घेता लहान सिलिंडरमध्ये काढून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून दुकानातून आठ घरगुती वापराचे सिलिंडर आणि २३ लहान सिलिंडर; तसेच गॅस रिफील करण्याचे इतर साहित्य असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.