संबंधित अल्पवयीन मुलगा नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. बारावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याने त्या मुलासह त्याच्या काही मित्रांनी मुंढवा रस्त्यावरील एका पबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. तो पब मध्यरात्री दीड वाजता बंद झाला. त्यानंतर ते जवळच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. तेथून अडीचच्या सुमारास निघाल्यानंतर रामवाडीच्या दिशेने जाताना अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर येथे दुचाकीला उडवले. स्थानिक नागरिकांनी मुलाला कारमधून बाहेर काढले. त्याने मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन केले होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
६० ते ७० मुलांची पार्टी?
मुंढवा रस्त्यावरील पबमध्ये शनिवारी मध्यरात्री ६० ते ७० मुलांची पार्टी झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शहर पोलिसांनी कल्याणीनगर आणि मुंढवा रस्ता परिसरातील काही पबमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ‘डीव्हीआर’ ताब्यात घेतले आहेत. पोलिस या प्रकरणाची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करणार का, असा प्रश्न केला जात झाला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचा काणाडोळा
दुकानांमध्ये मद्यविक्री किंवा बार-पबमध्ये मद्यसेवन करण्यासाठी कायद्याने वयाची अट घालून दिलेली आहे. त्याचे पालन केले जात आहे किंवा नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असते. मात्र, शहरातील अनेक पबमध्ये किंवा मद्याच्या दुकानांमध्ये अल्पवयीन मुलांना सर्रासपणे मद्यविक्री होते, याकडे उत्पादन शुल्क विभागाचा पूर्णपणे काणाडोळा होत असल्याचे दिसून येते.
कल्याणीनगर येथील अपघातातील कारचालक मुलगा त्याच्या मित्रांसह मुंढवा रस्त्यावरील एका पबमध्ये आणि हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ती मुले अल्पवयीन असतानाही त्यांना मद्यविक्री केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ती मुले नेमकी कोणत्या पब व हॉटेलमध्ये गेली होती, याची खातरजमा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त