पोलिसांचे दुर्लक्ष
वाइन किंवा बिअर शॉपमधून मद्य विकत घेतल्यानंतर ग्राहक ते जवळ थांबून पित असल्यास वाइन आणि बिअर मालकांवर कारवाई करता येत नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. दुकानांबाहेर मद्य पिण्याचे अड्डे शहरभर निर्माण झाले असताना, या तळीरामांवर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस कारवाई करू शकत असले, तरी त्यांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे.
शहरभर अड्डे
कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन मुलांचा बार आणि पबमधील वावर उघडकीस आला आहे. याबरोबरच वाइन शॉपमध्येही वय न पाहता देशी-विदेशी मद्याची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. खर्च टाळण्यासाठी वाइन आणि बिअर शॉपबाहेर पदपथावर, कट्ट्यावर, शेजारच्या दुकानांच्या पायऱ्यांवर बसून मद्य प्राशन करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. वाइन आणि बिअर शॉपच्या परिसरात दारू पिण्याचे नवनवीन अड्डे शहरात सुरू झाले आहेत. काही वाइन शॉप आणि बिअर बारने दुकानाच्या वरच्या मजल्यावर ‘बसण्याची सोय’ केली आहे. परमिट रूमचा दर्जा नसतानाही तेथे बैठक बसू दिली जात आहे.
टोळक्यांचे राज्य
वाइन आणि बिअर शॉपी परिसरात टोळक्यांचे राज्य सुरू झाले आहे. या टोळक्यांमध्ये वर्चस्वातून अनेकदा वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. वाइन आणि बिअर शॉपीच्या आसपास रहिवासी भाग; तसेच इतर आस्थापना असल्याने तेथील शांततापूर्ण जीवन धोक्यात आले आहे.
कचऱ्याचाही प्रश्न
वॉइन आणि बिअर शॉपीच्या बाहेर बाटल्या, ग्लास, सिगारेट, गुटख्याच्या पुड्या असा केरकचरा आणि लाल रंगाने रंगवलेल्या भिंतींमुळे अस्वच्छतेचा उग्र प्रश्नही निर्माण झाला आहे. या दुकानांमध्ये किंवा आसपास भरणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली, तरी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने हे अड्डे वाढत चालले आहेत.
अधिकारी म्हणतात…
वॉइन आणि बिअर शॉपजवळ भरणाऱ्या अड्ड्यांबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘वाइन किंवा बिअर दुकानातून केवळ मद्यविक्रीसाठी परवानगी आहे. या दुकानांच्या बाहेर किंवा आसपास मद्यप्राशन करणे चुकीचे आहे. मात्र, यासाठी दुकानाच्या परवानाधारकास जबाबदार धरता येत नाही. दुकानातून मद्य विकत घेतल्यानंतर नागरिक बाहेर काय करतात, यावर अंकुश ठेवता येत नसल्याचे वाइन शॉप चालकांचे म्हणणे आहे. या आधारावर त्यांचा परवाना रद्द करता येत नाही. या दुकानांनी मद्यप्राशन करण्यासाठी बैठक व्यवस्था केली असेल, तर कारवाई केली जाईल.’