उपनिरीक्षकाने तक्रार घेण्यास दिला नकार
पोलिसांच्या ताब्यात दिलेला दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बाराथे यांच्या भावाचे म्हणणे आहे. त्या वेळी येरवडा पोलिस ठाण्यात एक उपनिरीक्षक उपस्थित होते. बाराथे यांच्या भावाने दुचाकीस्वार गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तक्रार देऊ केली. त्यावेळी संबंधित उपनिरीक्षकाने तक्रार घेण्यास नकार दिला.
मद्यधुंद दुचाकीस्वाराला सोडले
त्यानंतर बाराथे यांचा भाऊ रुग्णालयात गेला. तेथून पहाटे दोनच्या सुमारास तो पुन्हा पोलिस ठाण्यात आला. दुचाकीस्वार तेथेच होता. त्या वेळी दुचाकीस्वाराने एका स्थानिक लोकप्रतिनिधीला फोन करून उपनिरीक्षकाशी बोलणे करून दिले. त्यानंतर दुचाकीस्वाराला कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले.
‘एमएलसी’ झाली; गुन्ह्याची प्रतीक्षा
दुसऱ्या जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी ‘एमएलसी’ दाखल केली. मात्र, बाराथे यांच्या भावाची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यांचा जबाबही घेतला नाही. दुचाकीस्वाराची वैद्यकीय तपासणीही केली नाही. अद्यापपर्यंत त्या दुचाकीस्वारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी तक्रारदाराला धमकावले?
या प्रकरणी जखमीचा भाऊ धनंजय बाराथे यांनी पोलिस आयुक्तालयात एक खिडकीत तक्रार अर्ज दिला आहे. तसेच, तीन दिवसांपूर्वी आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी बाराथे यांनी धंगेकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. धंगेकर बाराथे यांना घेऊन परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे गेले होते. त्या गोष्टीचा राग मनात धरून येरवडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बुधवारी बाराथे यांना पोलिस ठाण्यात आणून धमकावले, असा आरोप बाराथे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह मगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
अपघात झाला त्या दिवसाचे आणि बुधवारचे (२२ मे) येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासावे. दुचाकीस्वारासह त्यास मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
– धनंजय बाराथे, तक्रारदार