Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुण्यातील आणखी ६६ पब, बारला ठोकले टाळे

प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच असून, आता आणखी ६६ पब, बार, रेस्टॉरंटना टाळे ठोकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ६६ पब, बारला टाळे ठोकले असून, त्यात आणखी भर पडणार असल्याने शहर परिसरातील १३२ पब, बार बंद पडले आहेत.कल्याणीनगरच्या अपघातानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाने आपली नजर वळविली आहे. आतापर्यंत पब, बारबाबत नरमाईची भूमिका घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाविरोधात राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठविली गेली आहे. राजकीय नेत्यांच्या रोषालाही उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना गेल्या दोन दिवसांत चागंलेच सामोरे जावे लागले आहे. परिणामी, अधिकाऱ्यांनी शहरातील पब, बारवर लक्ष केंद्रित केले आहे. पब, बारवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने १७ पथके तयार केली आहेत. पथकात पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.

Nashik News : नाशिकमधे बिबट्याची दहशत; मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांमध्ये भीती, परिसरात पिंजरे लावण्याची मागणी

अपघात प्रकरणानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नियमभंग करणाऱ्या पब, बार, रेस्टॉरंटवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, दिलेल्या मुदतीनंतरही आस्थापना सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यसेवा पुरविणे, नोंदवही अपूर्ण ठेवणे, नोकरनामे सादर न करणे, परवाना नसलेल्यांना मद्य पुरविणे अशा कारणास्तव उत्पादन शुल्क विभागाने पब, बार रेस्टॉरंटवर कारवाईचा सपाटा सुरू ठेवला आहे.

त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये ६६ पब, बार, रेस्टॉरंटना टाळे ठोकले आहे. गुरुवारीही आणखी ६६ पब, बार, रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी पाठविला जाणार आहे. त्यावर तातडीने निर्णय होऊन ६६ पब, बार, रेस्टॉरंटला टाळे ठोकण्यात येतील, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हॉटेल, ढाब्यांवरही कारवाई

शहरातील पब, बार, रेस्टॉरंटवर कारवाई सुरू असली, तरी शहर आणि शहराजवळच्या भागात सुरू असलेल्या ढाब्यांवरही उत्पादन शुल्क विभागाने लक्ष वळविले आहे. विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल आणि ढाब्यांवरही कारवाई सुरू करण्यात येत आहे. काल, १३ हॉटेल आणि तीन ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना हॉटेल आणि ढाब्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याकडे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष वेधले आहे. आतापर्यंत मद्य पिण्यासाठी ग्राहकांना दोन लाख ३० हजार परवान्यांची विक्री केली आहे.