सर्व विभागांत ॲलर्ट
पुण्यातील कल्याणीनगर भागात ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर सर्व सरकारी विभाग अलर्ट झाले आहेत. वयाचे बंधन झुगारून मद्यविक्री करणे, विहित वेळेनंतर अनुज्ञाप्तीचे व्यवहार चालू ठेवणे आदी कारणांमुळे पुणे शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकां मार्फत मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पुणे ग्रामीण विभागातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकानांच्या संख्येबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
राज्यात मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज राज्य उत्पादन शुल्क विभागमार्फत केले जाते. मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती, वाहतूक, विक्री, आयात आणि निर्यात आदीसाठी विविध अनुज्ञप्ती परवाने मंजूर करून शुल्क जमा करण्याचे काम विभागाकडून करण्यात येते; तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पुणे ग्रामीण भागातील या विभागांतील अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकानांच्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘दुकाने माहीत नाहीत’
बारामतीत परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकानांत वयाचे बंधन झुगारून मद्यविक्री करण्यात येत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक दर्जाचे अधिकारी ‘दुकाने माहीत नाहीत,’ असे सांगत आहेत. ‘पुण्यातील घटनेला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासह निरीक्षक दर्जाचे अधिकारी कारणीभूत आहेत. म्हणून नियमभंग होत आहेत,’ असे अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले आहे.
बारामतीत नेमके दुर्लक्ष कोठे?
– परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू दुकाने.
– परमिट रूमचालक, मालक वाइन शॉपसारखा ‘डिस्प्ले’ करून मद्यविक्री करतात.
– बंदी असलेले (राज्य सरकारच्या अधिकृत डिलरकडून माल न दिलेला) अनुज्ञाप्तीत माल येतो कोठून?
– बंदी असलेली दुकाने सुरूच.
– सर्व अनुज्ञाप्तीमधून होलसेल मद्यविक्री होते.
– दारूच्या दुकानांसमोर सार्वजनिक ठिकाणी आडोसा करून ‘पिण्या’साठी व्यवस्था.
– मैदानावर सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज मैदानावर मद्य पिण्यासाठी रात्री गर्दी.
परमिट रूम, बिअर शॉपी, वाइन शॉप, देशी दारू या दुकानांच्या संख्येबाबत सध्या माहिती नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
– विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क