गुन्हा दाखल करण्यात चालढकल
विश्वकर्मा कुटुंबीय गेल्या २० ते २५ वर्षांपासून वेळू गावात वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुले आहेत. बेपत्ता झालेला त्यांचा धाकटा मुलगा आहे. तो बेपत्ता होण्यापूर्वी, राहत्या घराजवळील काही लोकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप विश्वकर्मा यांनी केला आहे. त्यानुसार, त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला आहे. मारहाण करणाऱ्यांनीच मुलाचे अपहरण केल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करून चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार
राजगड पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गोविंदलाल विश्वकर्मा यांनी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कार्यालयातही तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर राजगड पोलिसांनी विश्वकर्मा यांना पोलिस ठाण्यात बोलावले. तेथून मुलाबाबत काहीही माहिती नसताना, ते थेट सातारा शहरात गेले आणि रिकाम्या हाताने परत आले.
पोलिसांकडून दिशाभूल
मुलगा बेपत्ता झाल्यानंतर वेळू परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा संबंधित मुलाला काही लोकांनी मारहाण केल्याचे समोर आले. त्यामुळे विश्वकर्मा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. तेथे पोलिसांनी मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा नोंदवला. मात्र, नोंदवलेला गुन्हा अदखलपात्र आहे की अपहरणाचा आहे, याची कल्पना विश्वकर्मा यांना नव्हती. गुन्हा नोंदवून घरी आल्यानंतर त्यांच्या परिचिताने गुन्हा ‘अदखलपात्र’ असल्याचे सांगितले. त्यानंतर विश्वकर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. मात्र, अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले.
पीडित मुलगा दिव्यांग
दिव्यांगांचा छळ केल्यास ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार २०१६’मधील ‘कलम ९२’ नुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार दोषींना पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. कलम सहा आणि सातमधील तरतुदींनुसार दिव्यांगाचा छळ होत असल्यास प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी तरतूद आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनीदेखील काही महिन्यांपूर्वी यासंबंधीचे आदेश दिले होते. या घटनेतील मुलगा मतिमंद असून, तो दिव्यांग प्रवर्गात मोडतो. असे असतानाही राजगड पोलिसांनी अपेक्षित पावले उचलली नाहीत.
विश्वकर्मा यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘मिसिंग’चे प्रकरण दाखल करून घेतले. मुलाला मारहाण झाल्याचे समोर आल्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अपहरणाचा प्रकार असल्याची शक्यता नाही. त्यांनी तक्रार अर्जात नमूद केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली आहे.
– राजेश गवारी, वरिष्ठ निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे