Pune Crime : पंधरा दिवसांत १९ लॅपटॉप, ६३ मोबाइल लंपास; सख्ख्या भावांना अटक, विश्रांतवाडी परिसरातील घटना

प्रतिनिधी, येरवडा : उघडी घरे आणि पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांच्या घरांत शिरून मोबाइल, लॅपटॉप आणि स्मार्ट घड्याळे चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १९ लॅपटॉप, ६३ मोबाइल आणि चार स्मार्ट घड्याळे असा एकूण ३२ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या सख्ख्या भावांनी पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्या आहेत. बाबू राममूर्ती बोयर (वय २९) आणि सुरेश राममूर्ती बोयर (वय २४, रा. लोणी काळभोर, मूळ रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिंगरेनगर परिसरात पाच जून रोजी एका घरातून तीन मोबाइल आणि एक लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली होती. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलांच्या खोलीतून नऊ जून रोजी तीन लॅपटॉप आणि सात मोबाइल चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यांचा तपास करताना लॅपटॉप आणि मोबाइल चोरणारे दोन संशयित धानोरी खाणीशेजारी उभे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संजय बादरे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांना माहिती दिल्यावर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

Sharad Pawar: सरकारचे दुर्लक्ष कायम राहिले, तर मला…; शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये चार लॅपटॉप आणि सात मोबाइल सापडले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी लोणी काळभोर परिसरात जाऊन घराची झडती घेतल्यावर ३२ लाख रुपयांचे लॅपटॉप, मोबाइल आणि घड्याळे जप्त करण्यात आली. यामध्ये १४ आयफोनचाही समावेश आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, कर्मचारी बबन वणवे, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, शेखर खराडे, अक्षय चपटे आणि किशोर भुसारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.