गोष्ट आहे 90च्या दशकातली… महाराष्ट्रात प्रथमच युतीचा अर्थात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आलं होतं. या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री झाले. याच काळात महाराष्ट्रातले अनेक शहर आपला आकार बदलत होती. मुंबईमध्ये ‘छम-छम’ चा आवाज जोरदार कुमठायला सुरुवात झाली होती. याच आवाजाचा परिणाम मुंबईच्या जवळ असलेल्या पुणे शहरावर देखील झाला. पुण्यात देखील काही दक्षिणत्य उद्योजकांनी पब सुरू केले. तिकडे मुंबईमध्ये छम छम सोबतच गॅंगवॉरचे प्रमाण वाढले होते. आणि मुंबई लगतच असलेल्या पुणे शहरात देखील याची झळ पोचायला सुरुवात झाली होती.
पुण्यात सुरु असणाऱ्या ‘टेन डाऊनिंग स्ट्रीट’ या पब मालकावर हफ्ता वसुलीच्या प्रकरणातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात तो मालक बचावला. या पब मध्ये या गोळीबाराची घटना घडली त्यावेळेस एका मोठ्या चिकन व्यावसायिकाचा मुलगा देखील पार्टी करण्यासाठी उपस्थित होता. तोदेखील थोडक्यात या गोळीबारात बचावला. मात्र मुंबईतील गॅंगवॉर आणि टोळी युद्ध पुण्यात येऊन ठेपले होते. आणि त्यामुळेच हा पब मालक आपलं हॉटेल बार आणि पब बंद करून बाहेर पडला ते कायमचाच.
याच टोळी युद्धाचा पुढचा नंबर होता तो आणखी एका पबचा. नगर रस्त्यावरील रुबी हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटलच्या जवळ असणारा ‘ब्लॅक कॅडिलॅक’ पब… याच काळात या भागात हा पद सुरू झाला होता. यापबचा मालक देखील दक्षिणात्य. हा पब पुण्यातील त्यावेळेस सर्वात प्रसिद्ध असणारा पब होता. नव्यानेच येऊ घातलेल्या पब संस्कृतीचा हा पब आद्य भाग म्हणून ओळखला जात होता. संपूर्ण पुण्यात या पबची आणि नव्याने सुरू झालेल्या पब संस्कृतीची चर्चा कायमच होत होती. सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यामध्ये ही संस्कृती आता फोफायला सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी या पब च्या विरोधात आवाज उठवला. मोठी मोठी आंदोलन केली. मात्र फरक पडला तो शून्य. पुण्यात सुरू झालेलं शहरीकरण बदलती जीवनशैली आणि वाढतं नागरिकीकरण यामुळे पुणेकरांचा ओढ या पबकडे मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात झाली होती. आता ज्याप्रमाणे महापालिका पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळे बंद करून पबला पाठिंबा देत आहेत तेव्हा देखील असंच होत. या सगळ्या व्यवस्थेच्या आशीर्वादाने हा पब आपले पाय अधिकच घट्ट होऊन बसला होता.
‘ब्लॅक कॅडिलॅक’ नावाच्या पबची ख्याती थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे एकदा पुणे दौऱ्यावर आलेले होते. त्यांना या पबविषयी माहिती समजली. त्यांना हा प्रकार आवडलेला नव्हता.
त्या रात्री गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे हे दोघे नगर रस्त्याने जायला निघाले होते. दिलीप कांबळे यांनी या पबचा विषय गोपीनाथ मुंडे यांना आधीच सांगितला होता. मुंडेंच्या डोक्यात हा पब पक्का बसला होता. गोपीनाथ मुंडे यांची ख्याती ही डॅशिंग गृहमंत्री म्हणून होती. मुंबईतील टोळी युद्धाचा आणि अंडरवर्ल्डचा खात्मा करणारा आणि गुन्हेगारांना ज्याच्या नावाने थरकाप होईल असा गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे उदयास आले होते. आणि त्याचीच प्रचिती झाली ती पुण्यामध्ये.
ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि दिलीप कांबळे नगर रोडच्या दिशेने निघाले त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंनी आपल्या ताफ्यातील ड्रायव्हरला इशारा केला तो ‘ब्लॅक कॅडिलॅक’ पबकडे अन् क्षणातच गोपीनाथ मुंडेच्या गाडीचा ताफा थेट या पबच्या आवारात घुसवला. काही वेळ पबचे कर्मचारी आणि मॅनेजर यांना काही समजलं नाही. पण गोपीनाथ मुंडे यांचा दरारा असणारा आवाज बाहेर आला आणि समजलं थेट महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपल्या पब वर ‘रेड’ टाकलीय… कालांतराने हा पब सुरू झाला पण गोपीनाथ मुंडे यांच्या या डॅशिंग कारवाईची आणि तितक्याच बेधडक असणाऱ्या महाराष्ट्राला आणि पुणेकरांना आज नक्कीच आठवण होत आहे.