मोहोळ पहिल्यांदाच खासदार झाले असून, लगेचच त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक अशा महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. सहकार विभागाचे मंत्री अमित शहा असल्याने त्यांच्या नेतृत्वात थेट काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली असून, त्याचा फायदा पुणे शहरालाही होईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. त्या सहकार खात्याच्या राज्यमंत्रिपदी काम करताना त्याचा फायदा राज्यालाही होणार आहे.
विमानतळाला चालना?
पुरंदर येथील पुण्याच्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हा विमानतळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने मोहोळ यांच्या राज्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्याबाबत महत्त्वाचा निर्णय व्हावा, अशी सर्वच पुणेकरांची अपेक्षा आहे.
आज पदभार घेणार?
सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री अमित शहा असून, ते आज (मंगळवारी) सकाळच्या सत्रात पदभार घेणार असल्याचे समजते. शहा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यमंत्रिपदाचा पदभार मोहोळ स्वीकारतील, असे समजते
दिल्लीतच थांबण्याची तंबी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळच्या सत्रात संभाव्य मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी त्यांनी नव्याने पदभार घेणाऱ्या सर्व मंत्र्यांना महिनाभर दिल्लीतच थांबण्याची तंबी दिली आहे. दिल्ली, तसेच आपापल्या विभागांचे कामकाज समजावून घेतल्यानंतरच मतदारसंघामध्ये जावे. दिल्लीतील कारभार न समजताच आपआपल्या राज्यांमध्ये जावू नये, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधानांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.