Pune Accident: शिवानी अगरवालनंतर आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर, नवं सीसीटीव्ही फुटेज समोर

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांना रविवारी (२ जून) विशेष न्यायालयासमोर हजर केलं. रक्ताच्या नमुन्यांची फेरफार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या दोघांना ५ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे.

पोर्शे कार अपघातासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज ससून रुग्णालयातील असून त्यात रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाशी संबंधित दोन डॉक्टरांसह अल्पवयीन आरोपीचे आई-वडील आणि आजोबा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर येत असून पोलीस त्यादिशेने तपास करत आहेत.

पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं?

अल्पवयीन आरोपीचे घेतलेले खरे रक्ताचे नमुने कोणी फेकले, त्याची विल्हेवाट कशापद्धतीने लावली गेली यासाठी पोलीस अल्पवयीन मुलाचे आई-वडील, ड्रायव्हर आणि मित्रांची चौकशी करत असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने आई आणि वडिलांना ५ जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलाचा अपघातानंतर जो पहिला रक्ताचा नमुना घेण्यात आला होता, त्यात अल्कोहोलचं प्रमाण येऊ नये म्हणून तो त्याची शिवानी यांच्या रक्ताच्या नमुन्याशी बदलण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत शिवानीला अटक केली. ससून रुग्णालयातील अटकेतील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी मुलाचा पहिला आणि खरा रक्ताचा नमुना हा त्याच्या पालकांनाच विल्हेवाट लावण्यासाठी दिला असल्याची शक्यता आहे. तर, विशाल अगरवाल आणि डॉक्टर तावरे यांचा संपर्क करुन देणारा तसेच, हळनोर यांच्यापर्यंत पैसे पोहोचवणारा या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

त्यासाठी पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले त्यात हे संशयित दोघे दिसून आले असून पोलिस त्यादिशेने तपास करत आहेत. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.