कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालिन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल नामदेव घटकांबळे या तिघांना अटक केली. मात्र, हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून डॉ. हाळनोरने मुलाच्या रक्ताचा नमुना बदला. त्यासाठी विशाल अगरवालने डॉ. तावरेला फोन केला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. अगरवालला तावरेचा नंबर मिळाला कोठून, तावरे आणि अगरवाल यांच्यात मध्यस्थी कोणी केली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे डॉ. तावरेला आणखी कोणी संपर्क साधला होता का, याचा तपास पुणे पोलिस करीत आहेत. त्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात आहे.
मदत करणारी व्यक्ती तपासात समोर येईल
ससून रुग्णालयातील तिसरा आरोपी अतुल घटकांबळेमार्फत या प्रकरणातील पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताना उपस्थित असलेली व्यक्ती घटकांबळेच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अगरवाल कुटुंबीयांना या प्रकरणात मदत करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे पोलिस तपासात समोर येईल, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत योग्य प्रकारे कारवाई केली आहे. या प्रकरणात नियमबाह्य कृती करणाऱ्या कोणाही व्यक्तीला सोडणार आहे. – अमितेशकुमार, पोलिस आयक्त, पुणे शहर