अश्विनी कोस्टा हिचं वर्क फ्रॉम होम सुरु होते. त्यामुळे तिची आई तिला म्हणाली की कंटाळा आला असेल तर जरा बाहेर फिरुन ये, रिफ्रेश होशील. म्हणून ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. पण, त्या माऊलीने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिचा एक सल्ला तिच्या लेकीला तिच्यापासून कायमचा हिरावून घेईल. अश्विनीच्या आईने पुण्यातील ससून रुग्णालयात पोहोचताच टाहो फोडला. ती तिच्या वडिलांच्या वाढदिवशी जबलपूरला घरी जाणार होती, मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
“लेकीचा मृतदेह पाहताच आईचा टाहो”
घटना घडल्यानंतर तिथे उपस्थित अश्विनीच्या मित्रांनी तिच्याच फोनवरुन तिच्या घरी जबलपूर येथे फोन करत घटनेची माहिती दिली. बातमी ऐकताच तिच्या कुटुंबाने आक्रोश केला. लेकीला ससून रुग्णालयात मृत पाहून तिच्या आईने टाहो फोडला, त्यांची अवस्था पाहून साऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं.
अश्विनी ही जबलपूरची राहणारी होती. ती एक इंजिनिअर असून पुण्यात नोकरी करत होती. तिचं शिक्षणंही पुण्यातच झालेलं. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतलं.
शनिवारीच ती तिच्या आईसोबत बोलली होती. १८ जूनला ती तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जबलपूरला आपल्या घरी जाणार होती. तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितलं नव्हतं, ती त्यांना सरप्राइज देणार होती, अशी माहिती तिच्या आईने दिली. पण, आता त्यांची लेक खूप लांब निघून गेली आहे, तिथून ती पुन्हा कधीही परतणार नाही. तिच्या आईच्या डोळ्यातील आसवं थांबता थांबत नाहीयेत.
“मी आता एकटा पडलो”
अश्विनीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ती माझी लहान बहिण होती, मी आता एकट पडलो आहे. ती वडिलांशी रोज फोनवर बोलायची. तिने सांगितलं होतं की ती पार्टीसाठी बाहेर जात आहे आणि मग ही बातमी आली. तिच्याच मोबाईलवरुन आम्हाला फोन आलेला. तिच्या मित्राने फोन केला होता.