Prithviraj Chavan: दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकरावा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

मुंबई : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात अकराव्या स्थानी असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) दिलेल्या माहितीच्या आधारे केला. या आकडेवारीवरून चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा करण्याची मागणी केली.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा संपल्यानंतर चव्हाण यांनी राज्याच्या दरडोई उत्पन्नाचा मुद्दा मांडला. विधिमंडळात नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात सहाव्या स्थानी असल्याचे आणि गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्या उत्तरात याआकडेवारीचा उल्लेख केला. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य अकराव्या स्थानी आहे. आपल्यापेक्षा छोटी असलेली दिल्ली, सिक्कीम, पुद्दुचेरी, हरयाणासारखी राज्ये पुढे गेली आहेत. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह नाही, असे चव्हाण यांनी सरकारला सुनावले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या दाव्याचा प्रतिवाद केला. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या, सहाव्या स्थानी राहिले आहे. २०२०-२१ आणि २०२१-२०२२ मध्ये काहीच अंतर नव्हते. एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या या आधारे दरडोई उत्पन्न काढले जाते. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात राज्य मागे जाते, असे फडणवीस म्हणाले. चव्हाण यांची माहिती तपासून पाहण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.