पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांच्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे अमित गोरेखे यांचा आरोप?
दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांची पत्नी होती. तनिषा सुशांत भिसे असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं 10 लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नंतर या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण आता चांगलंच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान या प्रकरणात रुग्णाच्या नातेवाईकांकडून देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण दहा लाख रुपये भरण्यास सांगितले, तोपर्यंत आम्ही केस पेपरच तयार करणार नाही, असं रुग्णालयानं आम्हाला सांगितल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे.