“अनिल परब यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांबरोबर केली. या विकृत मानसिकतेचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परब यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो” असं भाजपचे आमदार प्रवीण दरकेर म्हणाले. भाजप आमदारांनी आज विधान भवनांच्या पायऱ्यांवर अनिल परब यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं. “संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला. माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय. हे रेकॉर्डवर घ्या. राज्यपालांच अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात अशा प्रकारच किळसवाणं वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र, हिंदुस्थान आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नखाची सर सुद्धा अनिल परब यांना नाही” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. “छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या शिवभक्तांनी पायऱ्यांवर अनिल परब यांचा धिक्कार केला. छत्रपती संभाजी महारांजासोबत स्वत:ची तुलना केली, त्या बद्दल अनिल परब यांनी सभागृहात माफी मागावी, अन्यथा त्यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
‘…तर जशास तसा धडा शिकवला जाणार’
“अनिल परब यांचं वक्तव्य असंसदीय, शोभणार नाही. सभागृहात त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना सळो की पळो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. हा अहंकार आला कुठून? छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा स्वत:ला मोठे समजता का? एवढी मुजोरी, माज कोणी करणार असेल, तर जशास तसा धडा शिकवला जाणार” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही
“अबू आझमीप्रमाणे अनिल परब यांच्या निलंबनासाठी 100 टक्के आग्रही आहोत. नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही. सभागृहाकडे महाराष्ट्राच लक्ष असते. अनिल परब यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून आम्ही या ठिकाणी पायऱ्यांवर आंदोलन केलं” असं प्रवीण दरेकर म्हणाले.