लोकसभेत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांनी हस्तक्षेप केला. लाड आणि इतर आमदार वेलमध्ये बसले त्यामुळे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. लाड यांनी परिषदेत राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्याचा ठराव मांडला आणि तो लोकसभेत पाठवण्याची मागणी केली. लाड यांनी ठरावावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी देखील केली.
यावेळी अंबादास दानवे यांनी आपल्याशी चुकीचे वर्तन केले. त्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप लाड यांनी केला. दानवे यांनी हिंदूंचा अपमान केल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण सभागृहाची माफी मागावी असे मागणी लाड यांनी केली.
दानवेंनी दिली प्रतिक्रिया…
लाड यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचलले तर त्याचे बोट मोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. माझा कोणताही तोल सुटलेला नाही. जो विषयाशी संबंधीत सभागृहाचा विषय नव्हता, सभापतींना बोलले पाहिजे. माझ्याकडे बोट करून, हातवारे करून सदस्याला बोलण्याचा अधिकार नाही असे सांगत. मी शिवसैनिक आहे. मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस, अशा शब्दात दानवे यांनी लाड यांच्या आरोपांचा समाचार घेतला.
लाड यांनी राहुल गांधी यांचा काही विषय मांडला होता. भाजपने सुरू केलेल्या या गोंधळावर विरोधीपक्ष नेता म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. त्यावर मी सभापतींना सांगितले की, हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? यावर आहे किंवा नाही हे उत्तर सभापतींनी द्यायचे असते. त्यांच्या उत्तरावर सभापतींना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना आहे, असे दानवे म्हणाले.
सभागृहात सदस्य सभापतींशी संवाद साधत असतात. अशात माझ्याशी हातवारे करून, विद्रुप हातवारे करण्याची गरज नव्हती. आता प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का? असा सवाल त्यांनी केला. मी जे काही बोललो त्याबद्दल मला पश्चाताप नाही. जे बोलले ते बोललो. माझा राजीनामा मागणारे ते कोण? माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी, असे सांगत दानवे यांनी विषय संपवला.