महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबत प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय

महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी नृत्याद्वारे शिवस्तुती सादर करणार होती. मात्र या कार्यक्रमावरून झालेल्या वादानंतर प्राजक्ताने माघार घेतली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला प्राजक्ता माळी अनुपस्थित राहणार आहे. प्रशासनावर ताण नको म्हणून तिने हा निर्णय घेतल्याची कबुली दिली आहे. मंदिरात प्राजक्ता भरतनाट्यम नृत्य सादर करणार होती. मात्र कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रसिद्धी मिळाल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळे आता प्राजक्ता माळी नाही तर इतर कलाकारांकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ताच्या कार्यक्रमाविरोधात ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवलं होतं. यापूर्वी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची मंदिरात परंपरा नाही असं म्हणत त्यांनी विरोध केला होता.

याविषयी प्राजक्ता म्हणाली, “मला पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नव्हती. कारण मंदिराच्या प्रांगणात किती गर्दी होईल आणि किती जण हा कार्यक्रम पाहू शकतील, असे सगळे प्रश्न होते. त्यामुळे मी सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची अजिबात माहिती दिली नव्हती. परंतु काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेत आहे.  कमिटमेंट असल्याने हा कार्यक्रम होईल, पण माझ्याऐवजी माझे सहकलाकार परफॉर्म  करतील. वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त महत्त्वाची आणि मोठी वाटते. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे.”

महाशिवरात्रीला सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाने चुकीचा पायंडा पाडू नये. या कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये, असं ललिता यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर पुरातत्त्व विभागानेही (ASI) त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवलं होतं. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इशारा एएसआयने दिला होता. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायद्यानुसार नियमबाह्य असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमांपूर्वी एएसआय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)