जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या पूजा खेडकर कामापेक्षाही त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चेत आल्या. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला होता. त्यानंतर मसुरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन संस्थेने खेडकर यांच्यासंदर्भातील सविस्तर अहवालही राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मागविला आहे. त्या पाठोपाठ केंद्रीय कार्मिक प्रशासनाकडूनही या प्रकाराची दखल घेण्यात आली आहे.
१४ गुंठे जमीन खरेदी
खेडकर कुटुंबीयांचे मुळशी तालुक्यातील जमिनीचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात चांगलेच अडकले आहे. आता जमिनीचे प्रकरण समोर येत असताना त्यांनी घेतलेल्या जमिनीशी ‘बारामती कनेक्शन’च असल्याचे समोर आले.
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ‘गट क्रमांक आठ’मध्ये स्थानिक रहिवाशांच्या जमिनी आहेत. त्याच ठिकाणी दिलीप कोंडिबा खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी १४ गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्याचा आता सातबाराही उपलब्ध झाला आहे.
तेच खेडकर असल्याचे निष्पन्न
खेडकर यांनी ही जमीन स्थानिक मालकाकडून खरेदी केली होती. खेडकर तेथील जमीनमालक असल्याचे तेथील स्थानिक जमीनमालकांना माहिती होते. ते पुण्यात राहतात, याचीही माहिती होती. मात्र, पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे वाघळवाडी येथील जमिनीचे मालक खेडकर कुटुंबीय तेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बारामती तालुक्यात त्याबाबत चर्चा सुरू झाली.
खेडकर कुटुंबीयांचे पदपथावर अतिक्रमण
खेडकर कुटुंबीयांनी बाणेर रस्त्यावरील त्यांच्या घराबाहेरील पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत हे अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे.