माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर २०२४) दसऱ्याच्या दिवशी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. मात्र आता याप्रकरणी एक मोठं यश पोलिसांना मिळालं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. झिशान अख्तर असे या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी जे फरार आरोपी आहेत, त्यामध्ये शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांचा समावेश आहे. झिशान अख्तर याच्या सांगण्यावरुनच बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, असे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघे सूचना देत होते, हे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
पंजाबच्या जालंधरमध्ये अटक
गेल्या अनेक महिन्यांपासून या झिशान अख्तरच्या मार्गावर मुंबई पोलीस होते. आता त्याला पंजाबच्या जालंधरमध्ये अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कलिया यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिश्नोई गँगच्या सदस्यांकडून झाला होता. हे सर्व आरोपी पाकिस्तानशी संबंधित होते. त्यातील एक आरोपी हा झिशान अख्तर असल्याची माहिती समोर येत आहे.
मोस्ट वॉन्टेड आरोपींपैकी एकाला अटक
सध्या झिशान अख्तरला पंजाबच्या जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी यांनी याबद्दलची खात्री केलेली आहे की झिशान अख्तर हा तोच आरोपी आहे जो बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आरोपी होता. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच येत्या काळात मुंबई पोलिसही त्याचा ताबा मागण्याचा प्रयत्न करु शकतात. मात्र बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी जे मोस्ट वॉन्टेड आरोपी आहेत त्यात शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांची नावे आहेत. आता लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रीय सदस्य असलेल्या झिशान अख्तरला पंजाबमध्ये अटक झाली आहे. आता पंजाब पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.