वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळ त्याच्याकडे ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे निलेशचे हगवणेंसोबत कौटुंबिक संबंध होते आणि आहेत, हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. निलेशनेही त्याच्या पत्नीचा छळ केला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने तो पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल त्याच्याविरोधात 2019 मध्ये वारजे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
3 जून 2018 ला निलेश चव्हाणचं लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरुममधील फॅनला काहीतरी अडकवल्याचा संशय आला. याबद्दल निलेशच्या पत्नीनं त्याला विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. फेब्रुवारीतही निलेशच्या पत्नीला घरातील एसीला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशनं पत्नीला उडवाउडवीची उत्तरं दिली होती. यानंतर निलेशच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या शरीरसंबंधाचे व्हिडीओ आढळून आले. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने हे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं निलेशच्या पत्नीला लक्षात आलं. पत्नीने याचा जाब विचारला असला निलेशने तिला चाकूने धमकावलं होतं आणि तिचा गळाही दाबला होता.
निलेशच्या पत्नीने सासू-सासऱ्यांना आणि कुटुंबातीला इतरांना याबद्दलची माहिती दिली असता त्यांनी तिचाच छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर निलेशसुद्धा पुढील काही महिने पत्नीचा छळ करत राहिला. अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तरीसुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. वैष्णवी आणि शशांक यांच्यातील वादात तो अनेकदा सहभागी असायचा. पेशाने तो बांधकाम व्यावसायिक आहे.
दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते फरार होते. तर हगवणे कुटुंबातील तिघांना आधीच पोलिसांनी अटक केली होती.