वादग्रस्त माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरी पुणे पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. मात्र पूजा खेडकर अद्यापही पोलिसांना सापडू शकलेल्या नाहीत, अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पुणे पोलीस कालपासून पूजा खेडकर यांच्या मागावर आहेत. पण अद्यापही पूजा यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पूजा खेडकर यांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पोलीस पूजा खेडकर यांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथक रवाना करु शकतात. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार असल्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता. पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर यांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करु शकतात, याची शक्यता वाढली होती. विशेष म्हणजे आता पोलिसांचं पथकच पूजा यांच्या बाणेर येथील घरी पोहोचलं आहे. पण पूजा खेडकर या त्यांच्या बाणेर येथील घरी सापडतील का? हे सांगणं कठीण आहे.
पूजा खेडकर प्रकरणात काय-काय घडलं?
पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना पुण्यात प्रक्षिणार्थी म्हणून नियुक्ती मिळाली होती. पण नियुक्ती मिळाल्यानंतर लगेच पूजा खेडकर यांच्याकडून अवास्तव मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्पेशल केबिन हवं होतं. याशिवाय त्यांना प्रशासकीय इतर सर्व योयीसुविधा हव्या होत्या. पण त्या प्रशिक्षणार्थी होत्या. त्यामुळे त्यांना लगेच सर्व सुविधा मिळणार नाहीत हे सांगण्यात आलं होतं. पण तरीही त्यांच्या अवास्तव मागण्या आणि वागणुकीला कंटाळून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना लेखी तक्रार केली. यानंतर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
या दरम्यानच्या काळात पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्रे सादर करत परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अनेक विविध मुद्दे पूजा खेडकर यांच्याबाबत समोर आले. अखेर पूजा खेडकर यांना लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये बोलावण्यात आलं. पण पूजा खेडकर तिथे गेल्याच नाहीत. या प्रकरणी यूपीएससी आयोगाने देखील कठोर पावलं उचलली. यूपीएससी आयोगाने पूजा खेडकर यांच्याविरोधात चौकशी समिती बसवली.
या प्रकरणी यूपीएससीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पूजा खेडकर यांचं पद रद्द करण्यात आलं. पूजा खेडकर यांच्यावर या प्रकरणी आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांनीदेखील न्यायालयात धाव घेतली. या सर्व प्रकरणावर आता न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. या दरम्यान खेडकर यांना अटकपूर्व जामीन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.