अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर अफरातफर प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 लाख 50 हजार रुपयांच्या अफरातफर प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी सात जानेवारीपासून आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या प्रकरणात आरोग्य विभागाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती देखील नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. त्यानंंतर आता आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अटकेत असलेले आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोतवाली पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आशा टॉकीज चौकात शिताफीनं त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं. या प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांना दोघांनाही पोलिसांनी अटक केलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांच्यावर अफरातफर प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 लाख 50 हजार रुपयांच्या अफरातफर प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समिती नेमण्यात आली होती, समितीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.