१४ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे होणार भूमीपूजन
गोरेगाव मुलुंड भुयारी मार्ग आणि बोरिवली ठाणे भुयारी मार्ग हे दोन्ही मिळून १४ हजार ७०० कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत. या दोन प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन पीएम मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ऑरेंज गेट ते ग्रँट रोड या उन्नत मार्गाचे देखील पीएम मोदी हे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. गोरेगांव येथील नेस्को सेंटरमध्ये भूमिपूजन सोहळा पार पडणार असून महायुती सरकारकडून पीएम मोदींच्या स्वागताची तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विशेषत: भाजप आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ प्लस महायुतीने डोळ्यासमोर ठेवले होते. परंतु त्यात अपयश आलं. ४८ जागांपैकी महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळवला. पीएम मोदी यांनी प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या होत्या. परंतु तरी सुद्धा महायुतीला यश मिळालं नाही.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतून जोरदार कमबॅक करण्याचे ध्येय महायुतीने ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाला वेग आला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी दाखवला आहे. तर महाविकास आघाडीच्या राज्यात १७० ते १७५ जागा निवडून येतील असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.