बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा 82 दिवसांनंतर अखेर महायुतीतील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ” राजीनामा झाला. मी त्याचं स्वागत करते. हा राजीनामा आधीच यायला हवा होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं” असं रोखठोक मतंच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलं. ” ज्यांनी राजीनामा घेतला तो आधीच घ्यायला हवा होता, धनंजयनेही तो ( राजीनामा) आधीच द्यायला हावा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आये दुरुस्त आए ” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे, क्रूरपणे हत्या करून त्यांचा जीव घेण्यात आला. त्या घटनेला 82 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर आज, महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड असून त्याच पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील काही नेतेसुद्धा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनीही मुंडे यांचा राजीनाना घेतला नव्हता. पण काल संतोष देशमुखांच्या हत्या करतानाचे काही क्रूर व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यावर संपूर्ण राज्य हादरलं आणि राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली.
त्यामधेये मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरून त्यांचा पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर गेला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून आपण तो स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आणि एकच खळबळ उडाली. या सर्व पार्श्वभूमीवरच आता भाजपच्या नेत्या आणि धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत ही प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख यांच्या आईची, कुटुंबियांची त्यांनी माफीही मागितली.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणून माझं बोलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी बोलत आहे. हा प्रश्न संवेदशनशील आहे. काही व्हिडीओ व्हायरल झाले. मला माहीत नाही. इन्स्टावर पोस्ट पाहिली. ते व्हिडीओ पाहण्याची हिंमत झाली नाही. एवढ्या अमानुषपणे मारलं. संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर मी पत्र दिलं होतं. मी व्यक्त झाले होते. यात कोण आहे, कुणाचा हात आहे, हे केवळ तपासयंत्रणेला माहीत असेल. मला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. ज्या मुलांनी हत्या केली, त्यामुळे सर्व समाज मान खाली घालून आहे. या समाजाचा दोष नाही. आता हा समाज मान खालून जगत आहे. जातीचा विषय नाही, गुन्हेगाराला जात नसते. निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांनाही जात नसली पाहिजे. आम्ही शपथ घेतली. कोणताही ममत्व भाव किंवा आकस ठेवून काम करू नये यावर मी ठाम आहे. देशमुख यांची हत्या झाली. ते माझ्या पदरात असते, पोटचे असते तरी मी तेच म्हटलं असतं. संतोष देशमुख यांच्या आईची मी क्षमा मागते,असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
राजीनामा झाला. मी त्याचं स्वागत करते. हा राजीनामा आधीच यायला हवा होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला हवा होता. धनंजयनेही द्यायला हवा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. मी लहान बहीण आहे. पण कोणत्याही बहिण किंवा परिवारातल्या लोकांना या दुखातून जावं लागेल असं वाटत नाही. पण खुर्चीत बसल्यावर राज्याचा विचार करावा लागतो. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आये दुरुस्त आए.