पालघरचा शिवसेना नेता अजूनही बेपत्ता, चार ताब्यात, एक फरार; आज दुपारी मोठे खुलासे होणार?

पालघरचे शिवसेना नेते अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणात त्यांच्या सख्ख्या भावासह इतर जणांवर आरोपाचा ठपका आहे. तर त्यांचा भाऊ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटल्याने पोलिसांवर दबाव वाढला आहे. तर याप्रकरणात आज दुपारी पोलीस मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.

4 जणांना घेतले ताब्यात

शिवसेना नेते अशोक धोडी अपहरण प्रकरणात संशयित 4 जणांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले. अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी संशयित म्हणून ताब्यात घेतले. रात्री पोलीस चौकीतून हा भाऊ फरार झाला आहे. अशोक धोडी आणि त्यांच्या ब्रिझा गाडीचा अध्याप ही पोलिसांना पत्ता लागला नाही.

पोलीस करणार दुपारी मोठा खुलासा

जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून, घातपात केला असल्याचा पोलीसांचा संशय वाढला असून, त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. पालघर पोलिसांचे 6 वेगवेगळे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. डहाणू, वाणगाव, नागझरी, गुजरात च्या दादरा नगर हावेली परिसरात पोलिसांचे पथक शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज दुपार नंतर अशोक धोडी अपहरण प्रकरणाचे सर्व खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

असा निसटला आरोपी

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. संशयित आरोपी अविनाश रमण धोडी पोलिसांच्या तावडीतून निसटला. घोलवड पोलिसांच्या वेवजी चौकातून संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. संशयित अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ आहे. दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन आणि जमिनीच्या वरून वाद सुरू आहे.

यापूर्वी दोनदा हल्ला

यापूर्वी याच संशयितांनी आमच्या वडिलांवर दोन वेळा हल्ला ही केला होता. मनोज रजपूत आणि अविनाश धोडी या दोघांची नाव पोलिसांना दिली आहेत. यांनीच आमच्या घरी येऊन सुद्धा वडिलांवर हल्ला सुद्धा केला होता, अशी माहिती त्यांच्या मुलाने काल दिली होती. पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी आहोत, असे ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)