Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी देशभरातून आलेल्या पर्यटकांना लक्ष्य केले. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश आहे. त्यात मुंबईतील डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांच्या दोन मित्रांचा समावेश आहे. अतुल मोने यांची मुलगी आणि पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्या दिवशी केवळ 15 मिनिटांत मोने, जोशी अन् लेले कुटुंबातील पुरुषांना गोळ्या घातल्या. हिंदू कोण? विचारत दहशतवाद्यांनी एकपाठोपाठ एक तिघांना आमच्यासमोरच संपवले, असे अतुल मोने यांच्या मुलीने ओक्साबोक्शी रडत सांगितले.
मयत अतुल मोने यांची मुलगी रूच्या मोने यांनी घटनेबाबत सांगितले, अचानक पहेलगाममध्ये असलेल्या ठिकाणी गोळीबार सुरू झाला. सगळ्यांना काय झाले ते कळत नव्हते. मी दोन जणांना गोळीबार करताना पाहिले. ते विचारत होते, हिंदू कोण? माझे संजय काका (संजय लेले) यांनी हात वरती केला. त्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या मारल्या. मग माझे हेमंत काका (हेमंत जोशी) काय झाले हे विचारले गेले. त्यांनाही त्यांनी गोळी मारली. मग माझे बाबा (अतुल मोने) ही त्यांना बोलले, गोळ्या मारू नका, आम्ही काही करणार नाही. मात्र बाबांनादेखील माझ्यासमोर गोळी मारली. मी काहीच करू शकले नाही, असे रुच्या मोने यांनी सांगितले.
स्थानिक लोकांनी मदत केल्याचे सांगत रुच्या मोने यांनी सांगितले की, बाबांना गोळी लागली. ते गेल्यानंतर आम्ही बाबांना उठवायचा प्रयत्न केला. मात्र, बाबा उठत नव्हते. त्यांना उठाता येत नव्हते. त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी असलेली लोक बोलली. ज्यांना गोळ्या लागल्या, त्यांना घेण्यासाठी आर्मी येईल. तुम्ही या ठिकाणावरुन आधी निघत सुरुक्षित ठिकाणी जा. त्यामुळे आम्ही तिथून निघालो.
काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी आई-बाबा जाऊन आले होते. त्यामुळे काश्मीर सुरक्षित असल्याचे आम्हाला वाटत होते. दुसऱ्यांदा आम्ही गेलो. परंतु त्यात सर्वस्व गमावले, असे सांगत रुच्या मोने हिने आम्हाला शासनाकडून न्याय हवा. दहशतवाद्यांना कठोर शिक्षा हवी, असे सांगितले.
अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का म्हणाल्या, आम्ही तीन कुटुंब फिरायला गेलो. अचानक गोळीबार झाला. त्यामुळे आम्हाला काही सुचले नाही. आमच्या घरातील करता माणूस गेलेला आहे. सरकारकडे आमची एकच मागणी आहे, दहशतवाद संपवावा…अतिरेक्यांचा बिमोड करा…
अतुल मोने हे रेल्वेत सेक्शन इंजिनिअर होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांचे नातेवाईक असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले यांच्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनाची योजना तयार केली होती.