डोंबिवलीच्या हेमंत जोशींचासकाश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
मुलाची 10वीची परीक्षा संपली, वर्षभराचा ताण उतरला, रिलॅक्स होण्यासाठी डोंबिवलीतील हेमंत जोशी हे कुटुंबासह फिरायला बाहेर पडले. काश्मीरला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते सहलीला गेले, पण तीच ट्रीप त्यांची अखेरची ठरली. पहलगाममध्ये काल दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह अतुल मोने, संजय लेले यांचाही बळी गेला. तर पुण्यातील 2 आणि नवी मुंबईतील एकानेही जीव गमावला,
डोंबिवलीतील अतुल मोने हे त्यांच्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेले होते. तसेच हेमंत जोशी देखील त्यांच्या कुटुंबासोबत फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी मोनिका आणि मुलगा देखील असल्याची माहिती समोर आली होत. मुलाची परीक्षा संपल्याने ते काश्मीरला गेले होते, मात्र तेथे हेमंत यांनी जीव गमावला.त्यांच्या मृत्यूने डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. फिरण्यासाठी गेलेल्यांना दहशतवादी गोळ्या घालतात, आम्ही सुरक्षित आहोत का असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
हल्ल्याची बातमी पाहून मेसेज पाठवला पण डिलीव्हरच झाला नाही…
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
हल्ल्याची बातमी समजताच रहिवाशांनी जोशी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचे स्टेटस पाहिले, मेसेजही पाठवला. मात्र मेसेज डिलीव्हरच झाले नाही, असे जोशी यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले . जोशी यांच्या निधनाची बातमी खरी आहे का? हे तपासण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले ,जोशी यांच्या सासऱ्यांना भेटले तेव्हा त्यांना ही बातमी खरी असल्याचे समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनचं सरकली.
जोशी यांच्य शेजारी राहणारे पाचपांडे यांनी जोशी यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्या सासऱ्याने ध्रुवने पाच वाजता आम्ही सुखरूप असल्याचा मेसेज पाठवल्याची माहिती दिल्याचे सांगितले . मात्र त्यानंतर हेमंत जोशी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्यांच्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
इमारतीतील रहिवाशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. सर्वसामान्य माणूस भारतात सुरक्षित आहे का ? काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वर गोळीबार होतो त्यामुळे भारतात आम्ही सुरक्षित आहोत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.