22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26 जणांना जीव गमवावा लागला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई सीमा बंद केली आहे. नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने तर अंतर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याने खबरदारी म्हणून काय करायचे याची माहिती देण्यात येत आहे. त्यातच आकाशात सतत विमानांच्या घिरट्या दिसत असल्याने पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे.
२०० ते २५० विमानाच्या घिरट्या
भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाले. परिणामी, उत्तर भारतातून विशेषतः दिल्ली, लखनौ व अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे. दररोज सुमारे २०० ते २५० विमाने महाराष्ट्र व गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर करून अरबी समुद्रावरून जात आहेत.
हवाई उड्डाणाचा कालावधी वाढला
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेभारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे विमानांचा उड्डाण कालावधी वाढला आहे. उत्तर भारतातील विमानांना गुजरात आणि महाराष्ट्रातील हवाई मार्गाचा वापर करावा लागत आहे.
डेस्टिनेशननुसार उड्डाणाचा कालावधी वेगळा असला, तरी एक ते दोन तासापर्यंतचा कालावधी वाढला आहे. अंतर वाढल्याने विमानांचे इंधन जास्त प्रमाणात वापरले जात आहे. अशा परिस्थितीत विमान कंपन्यांनी नफे खोरीचा विचार केलेला नाही.अद्याप विमानाच्या तिकीट दरात वाढ केलेली नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.विमान कंपन्यांनी रीरूट केल्यावर तो मार्ग लांबचा ठरणार आहे. इंधन व मनुष्यबळाचा वापर वाढल्याने येत्या काळात विमान कंपन्या तिकीट दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत. तर या विमान वाहतुकीचा पुणे विमानतळाला किती फायदा होतो हे लवकरच समोर येईल.