धाराशिवमध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा बाण आणि अजित पवारांचे घड्याळ देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महायुतीमध्ये वातावरण तापण्याची शक्यात आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
एकनाथ शिंदे यांचा बाण आणि अजित पवारांचे घड्याळ देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, सोबत घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मत दिलं. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का? असा प्रश्न सुरेश धस यांनी यावेळी केला आहे. दरम्यान सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बाणाची आणि आमची जुनी दोस्ती, मात्र एकनाथ शिंदे यांचा बाणही लोकांनी निवडून दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात कार्यकर्ते सांभाळणारा नेता जर कोणी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असं धस यांनी म्हटलं आहे. ते धाराशिवमधील परंडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान मी जे निवडून आलो त्यामध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या विजयामध्ये धाराशिव जिल्ह्याचा मोठा वाटा आहे, आणीबाणीच्या काळात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काम केलं आहे. गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याबरोबर सुजितसिंह ठाकूर यांनी काम केले आहे. 29 वर्ष पक्षाच्या सतरंज्या उचलण्याचे काम सुजितसिंह ठाकूर यांनी केले. भारत उदयचा कार्यक्रम झाला तर त्याची महत्वाची जबाबदारी सुजितसिंह ठाकूर यांना दिली होती, असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.