एका नऊ वर्षीय मेंदूमृत (ब्रेन डेड) मुलाच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाले. या मुलाला मेंदू विकार झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या मुलाला डॉक्टरांनी मेंदूमृत म्हणून घोषीत केले. यानंतर पालकांच्या संमतीने मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. अवयवदानातून प्राप्त झालेल्या अवयवांचे शहरातील विविध रुग्णालयांमधील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. ‘इनलॅक्स आणि बुधराणी रुग्णालयात या मुलावर उपचार सुरू होते. इनलॅक्स आणि बुधराणी रुग्णालयात झालेले हे पहिले अवयवदान आहे.
या मुलाला मेंदूचा विकार असल्याने ३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ८ जुलैला मेंदूमृत घोषीत करण्यात आले. मेंदूच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रक्रिया ९ जुलै रोजी पूर्ण झाली. वैद्यकीय चाचण्यांनंतर ९ जुलै रोजी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या ( झेडटीसीसी) प्रतिक्षा यादीनुसार मुलाचे यकृत, स्वादुपिंड, दोन्ही मूत्रपिंड आणि फुफ्फुस हे अवयवय शहरातील विविध रुग्णालयांमधील रुग्णांना देण्यात आले.
ज्युपिटर रुग्णालयात मूत्रपिंडाचा आजार असलेल्या ६४ वर्षीय पुरुषावर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. डेक्कन सह्याद्री रुग्णालयाला मूत्रपिंड आणि स्वादुपिंड देण्यात आले. पिंपरीतील डीपीयू रुग्णालयाला फुफ्फुस देण्यात आले आहे. रूबी हॉल क्लिनिक येथील रुग्णांसाठी यकृत देण्यात आल्याची माहिती झेडटीसीसीने दिली. झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, मेंदूमृत मुलावर नियमित उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने ३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी त्याच्या आईचे निधन झाले होते. पुणे विभागात यंदा जानेवारी ते जुलै या कालावधीत ३६ मेंदूमृत अवयवदात्यांकडून अवयवदान करण्यात आले आहे. या आठवड्यात चार मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे.
अशीच एक घटना ३ जुलै रोजी नांदेड येथे घडली होती. बँकेत अधिकारी असलेल्या अभिजीत ढोके यांचे एका अपघातात ब्रेनडेड झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे ५ जणांना जिवनदान मिळाले.