या अवयवांपैकी एक मूत्रपिंड बाई जेरबाई वाडिया रुग्णालयामधील गरजू रुग्णाला, तर दुसरे केईएम रुग्णालयात देण्यात आले. मुंबईच्या रुग्णालयामध्ये यकृत, तर चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात हृदयदान करण्यात आले आहे.
मेंदू मृतावस्थेत असलेल्या मुलीचं अवयव दान
सांताक्रूझ येथील रहिवासी असलेल्या प्रिया (नाव बदलले आहे) हिला ‘इम्यून थ्रोम्बोसायटोपेनिक परपुरा’ या गंभीर आजाराचे निदान झाले होते. तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. तिची प्रकृती ढासळत गेली. १३ जुलै रोजी तिच्या मेंदूमध्ये बिघाड होऊन तिला रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये तिचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयातील तज्ज्ञांच्या टीमने तिच्या पालकांचे समुपदेशन केले. पालकांनी संमती दिल्यानंतर तिचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्यात आले.
पालकांचे आभार
अशा परिस्थितीमध्ये मुलीचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रियाच्या पालकांचे आभार मानले आहेत. सामाजिक दातृत्वाप्रती असलेली ही जाणीव अशा अनेक कुटुंबांसाठी पथदर्शक ठरणार आहे, असा विश्वास रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी व्यक्त केला.
ही आहेत आव्हाने
मेंदू मृतावस्थेमध्ये असताना लहान मुलांचे अवयवदान केल्यास त्या अवयवांचा वापर हा प्रौढ रुग्णांमध्येही केला जातो. या अवयवांचा वापर प्रौढ रुग्णांमध्ये केला, तर ते तितकेच कार्यक्षम ठरतील का, असा प्रश्न असतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. आत्तापर्यंत जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये तीन बालरुग्णांमध्ये अवयवदान करण्यात आले आहे.
चौघांना नवजीवन मिळाल्याचे समाधान
मुलीच्या पालकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला यासंदर्भात माहिती दिली. हे पालक तीन वर्षांपासून मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी खेपा घालत आहेत. आता लेक राहिली नाही, पण तिचे अवयव दान करून चार जणांना नवजीवन दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.