कांदा महाबँक उत्पादकांना तारणार?
 नाशिक : कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी राज्यात नाशिकसह अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून कांद्याची होणारी परवड पाहता कांद्याबाबत शासनाने महाबँकेसाठी दाखविलेली संवेदनशीलता हे ही नसे थोडके अशा आशयाच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. तर महाबँक केल्याने कांदा साठवणूक होईल पण हमीभाव दीर्घकाळ घसरलेलेच राहिले तर महाबँकेचा उपयोग काय? अशा आशयाच्या प्रतिक्रीयाही शेतकऱ्यांच्या एका वर्गातून व्यक्त होत आहेत.लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्याने सत्ताधाऱ्यांना सपाटून मार दिल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. एनसीसीएफ, नाफेड व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यवहारांची अचानक सरकारने झाडाझडती घेऊन कांद्याला गांभीर्याने घेतल्याचे संकेत केंद्राने देऊ केले. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा निर्यात किंवा कांदा धोरणाविषयी ‘ब्र’ देखील न उच्चारता कांदा उत्पादकांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले होते. यानंतर दोनच दिवसात मुख्यमंत्र्यांनी आता नाशिकसह राज्यात चार ठिकाणी कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याचे दिलेले निर्देश शेतकऱ्यांसाठी आशादायी आहेत.

कांद्याचे उत्पादन नाशिकमध्ये सर्वाधिक होते. यामुळे नाशिकला महाबँक प्रकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात येणा आहे. समृद्धी महामार्गालगत सुमारे दहा जागांवर कांद्याची महाबँक साकारली जाणार असल्याने भविष्यात साठवणूक व वाहतुकीस बूस्ट मिळाल्याने कांदा दरांमध्येही शेतकऱ्यांना फायदा होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

कांद्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन शहरात कांद्याची बॅंक सुरू करणार
कांदा उत्पादकांसाठी सरकार काही भरीव करू पाहत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र, कांदा महाबँक हा कांद्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी अंतिम पर्याय ठरू शकणार नाही. कांद्याची विनाअट निर्यात सुरू करणे तितकेच गरजेचे आहे. कांदा दीर्घकाळ साठवून राहीला तरीही त्याला मिळणाऱ्या दरावर उत्पादकांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

‘शेतकऱ्यांचे हित जोपासा’

शेतकरी केंद्रबिंदु ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा, असे सांगतानाच शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी जेणे करून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम होईल. कांदा बँक परिसरात मुल्य साखळी विकसीत करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच जेएनपीटी, डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्र आदींचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.