काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, तीने सासरच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे.
दरम्यान आज हगवणे कुटुंबांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं हगवणे कुटुंबाच्या पोली कोठडीत वाढ केली आहे, वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने वाढवण्यात आली तर दुसरीकडे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या युक्तिवादादरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला आहे, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं वकिलानं कोर्टात म्हटलं आहे. यावर आता वैष्णवीच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले वैष्णवीचे मामा?
आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलीस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो. आमच्या वकिलावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारचं कोणतंही चॅटिंग झालं नसल्याचं आम्ही स्पष्ट करतो. आम्ही कोणाचाही मोबाईल काढून घेतलेला नाही. वैष्णवीचा मृत्यू 16 तारखेला झाला. मी स्वतः 17 तारखेला फोन करून बाळाची विचारणा केली, माझं करिष्मा सोबत बोलणं झालं होतं, राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मेव्हणीने सांगितलं की बाळ रडत आहे, त्याला घेऊन जा, ही एकतर्फी प्रेमाची बाब होती, पण दुसऱ्या बाजूला पैशांवर प्रेम होतं, अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणावर वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. चॅटिंग आणि इतर आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणात आता काही नवे सापडत नाही, म्हणून चुकीची माहिती पसरवली जात आहे. आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, असं वैष्णवीच्या काकांनी म्हटलं आहे.