पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते नागपुराता माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीती पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल शिक्षणावर देखील वक्तव्य केले. देशातील एम्स हॉस्पिटलची संख्या वाढवली असून गरीबांच्या मुलांना देखील मेडिकलचे शिक्षण मिळणार तेही मातृभाषेत असे ते म्हणाले.
सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात ही नवरात्रीच्या शुभेच्छा देत केली आहे. ‘आजपासून नवरात्रीचा पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात आज गुढीपाडवा, उगादीचा उत्सव सुरू आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरु अंगत देव यांचा अवतरण दिवसही आहे. आपले प्रेरणापूंज डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीचंही निमित्त आहे. संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षही पूर्ण होत आहे. आज या निमित्ताने मला स्मृती मंदिरात जाऊन डॉ हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळाली. आपण संविधानाच्या ७५ वर्षाचा उत्सव साजरा केले आहे. पुढच्या महिन्यात बाबासाहेबांची जयंती आहे. मी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना नमन केला आहे. या विभूतींना नमन करताना देशवासियांना नवरात्री आणि सर्व पर्वांची शुभेच्छा देतो’ असे मोदी म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्राबाबात मोठी माहिती
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ‘आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. देशातील गरीब मुलांना डॉक्टर बनता यावे यासाठी, आम्ही पहिल्यांदाच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण दिले आहे जेणेकरून ते भाषेच्या अडथळ्याशिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वस्त दरात औषधे
आम्ही गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहोत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना मोफत उपचार सुविधा मिळत आहेत. हजारो जनऔषधी केंद्रे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे पुरवत आहेत. देशभरातील शेकडो डायलिसिस सेंटर मोफत डायलिसिस सेवा देऊन हजारो कोटी रुपयांची बचत करत आहेत. गेल्या 10 वर्षांत, गावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत, जिथे देशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून टेलिमेडिसिनद्वारे सल्लामसलत, प्रथमोपचार आणि पुढील वैद्यकीय मदत दिली जात आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.