‘आता बापाचंही नाव बदला,’ जलील यांच्या टीकेवर चंद्रकांत खैरे संतापले, ‘रत्नपूर’च्या मागणीवर म्हणाले…

Chandrakant Khaire : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील खुलताबादचे (Khultabad) नाव रत्नपूर करा अशी मागणी केली जात आहे. याच खुलताबादमध्ये बादशाहा औरंगजेबाची कबर आहे. भाजपा तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाने ही मागणी केली आहे. असे असतानाच आता या नाव बदलण्याच्या मागणीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खुलताबादचे रत्नपूर हे नाव झालेच पाहिजे. आम्ही ही मागणी खूप दिवसांपूर्वी केलेली आहे, असं खैरे यांनी म्हटलंय.

खुलताबाद हे नाव कशाला पाहिजे?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळात या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते. त्यावेळी आम्ही रत्नपूरची आठवण करून दिली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे खुलताबादचं रत्नपूर करायचं असं म्हणाले होते. खुलताबाद हे नाव कशाला पाहिजे. खुलताबादचे नाव रत्नपूर झाले पाहिजे. म्हणूनच आम्ही खुलताबादला रत्नपूर असे म्हणतो, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
रामराज्य असताना खुलताबादचे नाव भद्रावती नगर होते. महाभारतावेळी या शहराचे नाव रत्नपूर ठेवण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या कटकारस्थानामुळे खुलताबाद हे नाव ठेवण्यात आलं. रत्नपूर हे नाव पौराणिक आहे. हेच नाव झालं पाहिजे, अशी मागणीही खैरे यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका

भाजपाने आता रस्त्यांची, शहरांची, रुग्णालयांची नावे बदलली आहेत. सर्व नावे बदलून झाली असून आता त्यांना त्यांच्या बापाचे नाव बदलण्याची वेळ आली आहे, असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले होते. यावर बोलताना, माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच. हे नाव आम्ही कधीही बदलत नाही. इम्तियाज जलील काहीही म्हणतात. त्यांच्या म्हणण्याला आम्ही महत्त्व देत नाही, असा पलटवार खैरे यांनी केला.

भाजपाची सत्ता, त्यांनी निर्णय घ्यावा- खैरे

भाजपानेही रत्नपूर नावाची मागणी केली आहे. या मागणीला आमचे समर्थन आहे. मात्र खुलताबादचे नाव रत्नपूर करण्याची मागणी आमची आहे. त्यांचे सरकार आहे. त्यांनी हे नाव बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घ्यायला हवा. नाव बदलण्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर नाव बदलतं, असंही खैरे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)