आता नो लेट मार्क, बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला मंजूरी

पंतप्रधान गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत बदलापूर – कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराला शुक्रवारी नेटवर्क प्लानिंग ग्रुपच्या ( NPG ) ८९ व्या प्लानिंग ग्रुप अंतर्गत मंजूरी दिली आहे. प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी ३२.४६० किमीच्या मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई कॉरीडॉर या ब्राऊन फिल्ड प्रोजेक्टला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रोजेक्टला मंजरी मिळाल्याने बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपूरी आणि कर्जत या शहरांना फायदा होणार आहे.

१४ किलोमीटर लांबीचा कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिकेचे काम एमयूटीपी फेज-३ अ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत आहे. या प्रकल्पाचा खर्च १,५१० कोटी रुपये आहे. या योजनेचा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार ५०:५० टक्के विभागून करणार आहेत.

कल्याण आणि कर्जतमधील सध्याच्या दोन मार्गिकेवरुन मेल – एक्सप्रेस आणि मालगाडी ट्रेन आणि उपनगरीय लोकल अशा विविध स्वरुपाची संमिश्र वाहतूक सुरु असते. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या सॅटेलाईट सिटीतून प्रवाशांना कल्याण आणि मुंबईला जाण्यासाठी योग्य उपनगरीय रेल्वे कनेक्टीव्हीटीची आवश्यकता आहे. सध्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली येथे लोकल टर्मिनेट करुन चालविल्या जातात.

लोकलच्या फेऱ्या वाढविता येतील

सध्या कल्याण-बदलापूर विभागात अतिरिक्त मार्गिका नसल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. कल्याण ते बदलापूर या नवीन उपनगरीय कॉरिडॉरमुळे उपनगरीय रेल्वे फेऱ्या वाढविता येतील आणि या शहरांना अत्यंत आवश्यक असलेली उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल,” असे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)