उमेदवाराचे नाव | पक्ष | विजय/पराजय |
पियूष गोयल | भाजप | |
भूषण पाटील | काँग्रेस | |
रईस डॉक्टर | बसप | |
कॉ. जयराम विश्वकर्मा | एसयूसीआय (सी) | |
सोनल गोंडाणे | वंचित |
भाजपचा सर्वात सुरक्षित बालेकिल्ल्यांपैकी एक अशी उत्तर मुंबईची ओळख आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये इथून गोपाळ शेट्टी प्रचंड मताधिक्क्यानं निवडून आले. २०१४ मध्ये जवळपास साडे चार लाख मतांनी निवडून आलेल्या शेट्टींनी २०१९ मध्ये त्याहून मोठा विजय मिळवला. तब्बल ४ लाख ६५ हजार २४७ मतांनी निवडून येत त्यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यानं विजयी होण्याचा मान मिळवला. पण तरीही यंदा पक्षानं त्यांचं तिकीट कापलं.
गोपाळ शेट्टींचं मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे. त्यामुळेच त्यांचं तिकीट कापल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. फडणवीसांनी निवासस्थानी पोहोचून त्यांची समजूत काढली. यानंतर शेट्टी प्रचारात दिसले. भाजपनं इथून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना तिकीट दिलं.
पियूष गोयल उत्तर मतदारसंघाचे रहिवासी नाहीत. काँग्रेसनं इथून भूषण पाटील यांना उमेदवारी दिली. ते स्थानिक आहेत. त्यांनी याच मुद्द्याचा वापर प्रचारात केला. स्वत:ची ओळख त्यांनी स्थानिक उमेदवार म्हणून करुन दिली. पण संपूर्ण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क नाही. काँग्रेसची ताकददेखील मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची भिस्त ठाकरेसेनेवर अवलंबून होती. काँग्रेसला इथे कित्येक दिवस उमेदवारच मिळत नव्हता..
उत्तर मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. एका मतदारसंघात शिंदेसेनेचा आमदार आहे. तर एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे राम नाईक सलग पाचवेळा विजयी झाले होते. १९८९ ते २००४ अशी १५ वर्षे ते खासदार राहिले. यावरुन मतदारसंघातील भाजपची ताकद अधोरेखित होते.