धारावीच्या आमदार असलेल्या वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्यऐवजी उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, सोपा विजय काँग्रेसने आव्हानात्मक करून घेतल्याची चर्चा रंगली होती. मराठी व मुस्लिम मतदारसंख्येत पाच-पंचवीस हजारांचा फरक आणि एमआयएम पक्षाचा मुंबईतील एकमेव उमेदवार, यामुळे महायुतीचे पारडे जड मानले जात होते.
उत्तर मध्य मतदारसंघात मोदीलाटेत भाजपच्या पूनम महाजन यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये विजय मिळवला. २०१४ साली त्या १.८६ लाख मतांनी विजयी झाल्या असल्या, तरी २०१९ मध्ये जवळपास ५० हजार मते कमी होऊन त्या १.३० हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. या दोन विजयांपूर्वी काँग्रेसने तब्बल सात वेळा याच मतदारसंघात विजयी गुलाल उधळला होता. यामुळे हाताचा पंजा पाहून मतदान करणारा मतदार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. पूनम महाजन यांना तिहेरी विजयाची संधी असताना निकम यांना इथे उमेदवारी देण्यात आली.
२००४ मध्ये एकनाथ गायकवाड यांनी खासदारकी याच मतदारसंघातून मिळवली होती. यंदा २०२४ मध्ये त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघात १७ लाख मतदार असून, मुंबईतील सर्वाधिक मुस्लिम मतांचा टक्काही इथेच आहे. २७ पैकी वरील तीन उमेदवार वगळता उर्वरित २४ पैकी १६ उमेदवार मुस्लिम समाजातील असल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होणार की कसे, यावर विजय भाजपच्या पारड्यात जाणार की काँग्रेसच्या हे ठरणार होते.
वांद्रे पश्चिमेत आशीष शेलार, विलेपार्लेत पराग आळवणी (दोन्ही भाजप), कुर्ल्यात मंगेश कुडाळकर, चांदिवलीत दिलीप लांडे हे शिवसेनेत गेले असले तरी कलिनात संजय पोतनीस हे ‘उबाठा’ गटाचे व वांद्रे पूर्व येथे झिशान सिद्दीकी हे नावापुरते का होईना काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे चार विरुद्ध दोन अशी आमदारांची संख्या आहे. दोन्ही उमेदवारांचा राजकारणातील अनुभव पाहता गायकवाड या ज्येष्ठ ठरल्या आहेत. वडिलांचा राजकीय वारसा असलेल्या गायकवाड यांनी आमदार, मंत्रिपदे अनुभवली आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
त्या तुलनेत निकम राजकारणात नवखे आहेत. आपला राजकारणातील जन्म उमेदवारी घोषित होण्याच्या आठ ते १० दिवसांपूर्वी झाल्याचे त्यांनी स्वतः ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यासपीठावर कबूल केले आहे.