पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ती म्हणजे वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तीने आम्हत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पैसे मागत होते, मारहाण करत होते, या सगळ्या घटना घडत होत्या. लोकांची मानसिकता बदलायला हवी, सून म्हणजे मुलगीच असते. अतिशय दुर्दैवी फोटो आहेत. वैष्णवीच्या आई वडिलांची मानसिकता खालावली आहे.
समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे. नऊ महिन्याचं बाळ समोर असातना मुलगी असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे, वैष्णवीचं स्त्रीधन जप्त करण्यात आलं आहे, तसेच तिचा पती आणि तिचा दीर यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं आहे, तसेच तिच्या सासऱ्यानं पळून जाण्यासाठी जी कार वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आज वैष्णीचे दोन्ही भाऊ आणि तिच्या एका मैत्रिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.