भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आणि भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाचा संयुक्त दैदिप्यमान सोहळा वरळी येथील जांबोरी मैदानात पार पडणार आहे. येत्या शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने १३४ किलोचा महाकाय केक सजवला जाणार आहे.
भिमोत्सव समन्वय समिती वरळी २०२५ आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात १३४ किलोचा भव्य केक आणि आकर्षक आतषबाजी केली जाणार आहे. हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
या सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, बालकलाकार अनन्या तांबे, भारत गणेशपुरे, गायक रूपकुमार राठोड, सोनाली राठोड, गायक संदेश विठ्ठल उमप, जगविख्यात गायक संजय सावंत, इंडियन आयडॉल फेम मुकेश पांचोली, दीक्षा शिर्के आणि कबीर नाईकनवरे हे कलाकार उपस्थित असणार आहेत. यावेळी या कलाकारांच्या गायनाचा आणि उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपस्थितांना आनंद घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे संगीतबद्ध गायन करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम करणार आहेत. या विक्रमाचे ३/४ भाषांमधील प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर केले जाणार आहे.
लकी ड्रॉच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षिसे
या कार्यक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी महाराष्ट्र बाजारपेठ, दादर यांच्या सौजन्याने लकी ड्रॉच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षिसे, पैठणी, सुटाचे कपडे, सोन्याची नथ, चांदीचे नाणे, शालेय साहित्य, नऊवारी लुगडी आणि हजारो रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, भिमोत्सव समन्वय समिती आणि एन. एस. चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब मुलांसाठी ‘समता चषक २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी जांबोरी मैदानावरील अंबिका माता भवन या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय कदम यांनी नागरिकांना सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.