Neelam Gorhe: विधानपरिषदेत शाब्दिक संघर्ष; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मी तसं काही बोलले असेन तर ते वक्तव्य…

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील अनेकदा वाद झाल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधक यांच्यात देखील संघर्ष पहायला मिळाला. अंबादास दानवे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांच्यासोबत पाहा काय झाले.

विधानपरिषदेत तुम्ही गोंधळ घालता कारण तुम्हाला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काम करतोय हे दाखवायचे असते, असे वक्तव्य उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानावर अनिल परब यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही किती काम करता हे दाखवायचे असते यासाठी तुम्ही आम्हाला बोलू देत नाही, असे जर मी म्हटले तर याचा तुम्हाला राग येईल ना? मी उद्धव ठाकरेंना माझे काम दाखवले आहे, म्हणूनच त्यांनी चार वेळा मला आमदार केले. असे सांगत अनिल परब यांनी गोऱ्हे यांना त्यांनी केलेले वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली.

अनिल परब यांच्या या भूमिकेनंतर गोऱ्हे यांनी सामोपचाराची भूमिका घेत, मी जर काही अनावधानाने बोलली असेल तर तपासून तसे वक्तव्य कामकाजातून काढून टाकते असे आश्वासन दिले. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला होता.

पावसाळी अधिवेशनात याआधी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले होते. विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. इतक नाही तर उद्धव ठाकरे यांनी दानवे यांनी शिवीगाळ केली म्हणून संपूर्ण राज्याची माफी देखील मागितली होती. अखेर दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला होता.