नवीमुंबईत मुंबईतील तिसरे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळामुळे नवीमुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीमुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतेच विमानाची उड्डाण चाचणी देखील यशस्वी झाली आहे.हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे. त्यामुळे या विमानतळावर अनेक पद्धतीचे रोजगार तयार होणार आहेत. यासाठी प्रकल्पग्रस्थांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिडको आणि कौशल्य विकास विभागाच्या विद्यमाने नवी मुंबई विमानतळाच्या कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे नवे द्वार उघड होणार आहे.
कौशल्य विभागाच्या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राज्यातील लाखो तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. आता सिडको आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना आता रोजगाराचे नवे दालन उघडले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी सबंधित प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे.
सिडको उभारत असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी या नवीमुंबई परिसरातील अनेक गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीमुंबई विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण तरुणांना देण्यासंदर्भात सिडकोचा प्रस्ताव कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला सादर झाला होता. या प्रस्तावाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
पाच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश
प्रकल्पग्रस्तांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पाच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. त्यात एअरलाईन बॅगेज हॅण्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाईन ग्राऊंड स्टाफ अर्थात विमानतळ सेवा क्षेत्राशी संबंधित अशा पाच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा केला समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ११९१ प्रकल्पग्रस्तांनी यात नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ( https:www.mahaswayam.gov.in) महास्वंयम संकेतस्थळावर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर केंद्राच्या कौशल्य विकास निकषानूसार प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.